
चांद्रसेनीय कायस्थ प्रभु ज्ञातीचा इतिहास हा मुख्यतः स्थलांतराचा इतिहास आहे. इ.स. १३०५ मध्ये मांडवगडच्या पतनानंतर महाराष्ट्रात मुख्यतः कोकण आणि मावळ प्रांतात जी कायस्थ प्रभु कुटुंबे स्थलांतरित झाली त्यांनी ते रहात असलेल्या परिसरातच अध्यात्मिक आधार शोधायचा प्रयत्न केला. यातूनच “कुलदेवता” संकल्पना दृढ झाली. ठराविक कुळे ही त्यांना सोयीच्या ठराविक देवस्थानी नियमित जात राहिल्याने तेच त्या कुळाचे कुलदैवत निश्चित झाले. अन्यथा, अमुक गोत्राचे किंवा कुळाचे कुलदैवत अमुकच का ह्याचं नेमकं उत्तर देणं अवघड आहे. महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेल्या अशाच अनेक स्थानांपैकी काही निवडक स्थानांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :
*१) खाजणी : इंदापूर-मुरुड रस्त्यावर तळा गावापासून काही अंतरावर असलेल्या खाजणी गावातील डोंगरावर श्रीखाजणाई अर्थात कालिकाई देवीचे प्राचीन व प्रशस्त मंदिर आहे. ज्ञातीतील राजे, घोसाळकर देशमुख आदि अनेक कुटुंबांची ही कुलदेवता आहे.
*२) तळा : ज्ञातीभूषण सी. डी. देशमुखांचं हे गाव. इथल्या समस्त देशमुख, कुळकर्णी आदि प्रभु कुटुंबियांचे श्रद्धास्थान म्हणजे इथली ग्रामदेवता श्रीचण्डिका. हिचे दर्शन घेऊन मगच पुढे वानस्थे येथे दर्शनासाठी जातात.
*३) वानस्थे : देशमुख (प्रधान) कुटुंबाची कुलदेवता असलेल्या श्रीकालिकाई देवीचे हे मंदिर तळा गावापासून तीन किमी. अंतरावरील वानस्थे येथील डोंगराच्या पायथ्याशी आहे. मूळचे वानस्थे येथील जमीनदार असलेले प्रभु पुढे तळा येथे स्थायिक झाले. प्रस्तुत मंदिरात श्रीबापूजीबुवा, श्रीयोगेश्वरी व श्रीकालिकाईच्या देखण्या मूर्ती आहेत.
*४) वावे हवेली : इंदापूर-तळा रस्त्यावरील वावे हवेली हे एक दुर्गम गाव असून मुख्यतः डोंगरे कुटुंबाची कुलदेवता असलेल्या कालिकाई देवीचे प्राचीन मंदिर येथे पहावयास मिळते. दुर्गम ठिकाणी असल्याने इथे येणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. परिणामी, आज मंदिराची अवस्था फारशी चांगली नाही.
*५) कडापे : विळे भागाड ते माणगांव रस्त्यावरील जिते फाट्याने आत गेल्यास कडापे हे श्रीकालिकाई व श्रीबापूजीबुवा यांचे जागृत देवस्थान आहे. पूजनीय जानकी माता बालपणी ह्याच मंदिरात येऊन बसत असत. सुळे, रणदिवे, कुळकर्णी, टिपणीस, देशपांडे आदि अनेक कायस्थ कुटुंबांची ही कुलदेवता आहे. इथे वर्षभर भोजन व निवासाची सशुल्क व्यवस्था केलेली आहे.
*६) तिसे : रोहा तालुक्यातील श्रीकेदारजननीचे मुख्य स्थान असलेले हे मंदिर थोडे उंचावर असले तरी येथे भाविकांच्या सोयीसाठी पायथ्याशीही एक मंदिर उभारण्यात आलेले आहे. दिघे-देशपांडे कुटुंबाचे हे कुलदैवत असून इथे माघी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
*७) ताम्हिणी : पुण्याजवळील निसर्गसंपन्न ताम्हिणी घाटाच्या सुरुवातीलाच असलेल्या ह्या गावातील विंध्यवासिनी श्रीविंझाई देवीचे हे स्थान अतिप्राचीन आहे. प्रामुख्याने प्रधान कुटुंबांची ही कुलदेवता आहे.
*८) वांगणी : नसरापूर-वेल्हे रस्त्याने करांजवणे फाट्याने आत वळल्यावर वांगणी ह्या गावात जाता येते. कायस्थ नररत्न बाजीप्रभु देशपांडे (प्रधान) यांची कुलदेवता असलेल्या श्रीमळाई देवीचे दर्शन घेण्यास अनेक कायस्थ कुटुंबे मोठ्या श्रद्धेने येत असतात. लवकरच मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून नजीकच्या काळात भव्य स्वरूपातील मंदिर पहावयास मिळेल.
*९) नागांव : अलिबाग जवळील नागांव येथील श्रीमहाकाली दक्षिणमुखी देवीचे हे प्राचीन मंदिर मथुरे, चिटणीस आदि कुटुंबांचे कुलदैवत आहे. चिटणीस कुटुंबीयांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरात पाच फूट उंचीच्या दोन पेशवेकालीन समया आहेत. नागांवचे शिल्पकार साबाजी तुकाजी चिटणीस व बंधू कृष्णाजी तुकाजी चिटणीस हे होते. त्यांचे वंशज जिवाजी बल्लाळ चिटणीस यांच्या पुढील वंशजांनी ह्या मंदिराची स्थापना केली होती.
*१०) मुठे : पुणे-मुळशी रस्त्याने पिरंगुट येथून मुठे देवस्थानाकडे जाता येते. येथील श्रीजननी देवी ही प्रामुख्याने दिघे कुटुंबाचे कुलदैवत आहे. इथे चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव असतो.
*११) वेहेरगाव, कार्ला : मुंबई-पुणे रस्त्यावरील कार्ले गावाजवळील वेहेरगाव येथील डोंगरावर असलेले श्रीएकविरेचे हे प्राचीन मंदिर म्हणजे कोळी, आगरी, कायस्थ प्रभु वगैरे समाजाचे आराध्य दैवत आहे. मुख्य मंदिर वर डोंगरावर असले तरी भाविकांच्या सोयीसाठी पायथ्याशीही देवीचे एक मंदिर बांधण्यात आलेले आहे. ह्या डोंगरावरील बौद्धकालीन लेणी अतिशय प्रेक्षणीय आहेत.
*१२) चौल : रेवदंडा बंदराजवळील इतिहासप्रसिद्ध चौल गावातील श्रीभगवती देवी ही कुळकर्णी (कर्णिक) कुटुंबाची कुलदेवता असून ह्या प्राचीन मंदिरात कुळकर्णी कुटुंबे दरवर्षी मोठ्या संख्येने एकत्र येतात.
*१३) खंडाळा : खंडाळा घाटातील राजमाची पॉईंटजवळ असलेले श्रीवाघजई देवीचे मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. कुठेही न दिसणारे दृश्य म्हणजे, शंकरासमोर जसा नंदी असतो, तसा येथे देवीसमोर वाघ बसलेला आहे. काही प्रधान, चौबळ, खोपकर कुटुंबांची ही कुलदेवता आहे.
*१४) नारोळी : बारामतीजवळील नारोळी हे गाव म्हणजे “निळो बल्लाळ चिटणीस” यांच्या वंशजांचे गाव होय. येथील श्रीतुकाई देवी हेच ह्या कुटुंबाचे कुलदैवत व ग्रामदैवत. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला देवीचा वार्षिकोत्सव नारोळीकर चिटणीस मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
… यांशिवाय खोपोलीचा बहिरी, नागशेतजवळील कोंडजाई देवी, दाभोळची श्रीचण्डिका, तुळजापूरची श्रीभवानी, अमरावतीची श्रीअंबिका व श्रीएकविरा, नाशिक जिल्ह्यातील पट्टागड येथील अंबा-लिंबा, मुंब्र्याची मुंब्रा देवी, साताऱ्यातील वर्धनगडची वर्धिनीदेवी अशा अनेक देवीदेवता वेगवेगळ्या कायस्थ प्रभु कुटुंबांच्या कुलदेवता म्हणून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पहायला मिळतात. ह्याशिवाय महाराष्ट्राबाहेरही मध्यप्रदेशमधील धारच्या दत्त मंदिरापासून ते थेट पाकिस्तानातील हिंगलाजमाता मंदिरापर्यंत कायस्थांची श्रद्धास्थाने विखुरलेली आहेत.
–संकलन : संजीव माधव सुळे
Be the first to comment